नवी दिल्ली : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान त्यांच्या एका भाषणात काळ्या पैशांबाबत बोलताना अप्रत्यक्ष रित्या मतदाराला एक आमिष दाखवलं होतं. त्याचा सामान्यांवर मोठा प्रभाव पडून मतदान सुद्धा झालं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्तव्य केलेलं कि, प्रत्येक नागरिकांच्या बॅंक खात्यात १५ लाख रुपये जमा होतील. त्याचाच संदर्भ घेऊन मोहन कुमार शर्मा यांनी नोटबंदीच्या घोषणेच्या १८ दिवसांनंतर म्हणजे २६ नोव्हेंबर २०१६ रोजी आरटीआय अंतर्गत १५ लाख रुपयांबाबत माहिती मागितली होती. परंतु नरेंद्र मोदींच्या घोषणेबाबत विचारलेला प्रश्न माहिती अधिकार कायद्यात येत नाही, त्यामुळे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही असं उत्तर पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिलं आहे.
तसेच नेमके कोणत्या तारखेला १५ लाख रुपये भारतातील नागरिकांच्या बॅंक खात्यात जमा होणार याबाबत मोहन कुमार शर्मा यांच्याकडून माहिती अधिकाराद्वारे विचारणा करण्यात आली होती. इतकच नव्हे तर पंतप्रधान कार्यालय आणि आरबीआयने तपशीलवार माहिती दिली नाही अशी तक्रार सुद्धा मोहन कुमार शर्मा यांनी केंद्रीय माहिती आयोगाचे प्रमुख आर.के. माथुर यांच्याकडे केली होती.
