वडगाव: राज्यभरात आघाडीच्या प्रत्येक नेत्याच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या सभांदरम्यान नागरिक भाजपा आणि शिवसेनेच्या कारभाराबद्दल जाहीरपणे बोलत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आघाडीला १७५ जागा निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचाररॅली दरम्यान ते बोलत होते.
वडगांव शेरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य रॅली मध्ये सहभागी झालो. यावेळी तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद लाभला. pic.twitter.com/OO45CzGjR7
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 14, 2019
“राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधारी भाजपा आणि सेनेकडून मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतदेखील घोषणा करण्याचं काम करत आहे. भाजपाने पाच रुपयात तर शिवसेनेने १० रूपयात जेवणाची थाळी, एक रुपयात आरोग्य तपासणी करण्यात येईल अशी आश्वासनं दिली आहेत. हे सर्व मागील पाच वर्ष सत्ता असतानाही करू शकले असते, तेव्हा त्यांनी झोपा काढल्या का?.” अशा शब्दांत अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपा आणि सेनेवर सडकून टीका केली.
तत्पूर्वी कर्जत-जामखेड या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी खर्डा येथे सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राम शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यंनी ‘मी आरे ला कारे म्हणणारा माणूस आहे. हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. जर कोणी दम दिला तर त्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो’असं विधान केले आहे.
यावेळी बोलताना त्यांनी ‘आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला कोणी धक्का लावला, तर त्यांच्याकडे बघून घेईन. मी लोकशाही मानणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मानणारा आहे. मी घटना-कायदा मानणारा आहे. आमचे कार्यकर्ते जर नीट आचारसंहितेचं पालन करत असतील आणि कोण बाहेरचे आणले, तर मलाही जशास तसं उत्तर देता येतं असं विधान केले आहे.
