मुंबई: पुण्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. मैदानांवर अगदी चिखलाचं साम्राज्य तयार झालं आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांच्या प्रचारात अडचण तयार झाली आहे. पुण्यातील मुसळधार पावसाने राज ठाकरेंची बुधवारी (9 ऑक्टोबर) होणारी पहिला प्रचारसभा देखील रद्द करावी लागली. त्यामुळे अखेर मनसेनं निवडणूक आयोगाकडं रस्त्यावर सभा घेऊ द्या, अशी मागणी केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबत मनसेची भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरे यांची पहिलीच प्रचारसभा पुण्यात होणार होती. राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. पण पावसामुळं मैदानात चिखल झाला आणि सभा रद्द करावी लागली. त्यामुळं आता मैदानांऐवजी रस्त्यावर प्रचारसभा घेण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी मनसेनं केली आहे. पाऊस लांबला आहे. मैदानांमध्ये पावसाचे पाणी साचून चिखल होत आहे. त्यामुळं सभा घेण्यात अडचणी येत आहेत. रस्त्यांवर सभा घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचं पत्र मनसेनं राज्य निवडणूक आयुक्तांना पाठवलं आहे.
अनेक ठिकाणी मैदानांच्या ठिकाणी सायलन्ट झोन (शांतता परिसर) आहे. हवामान खात्यानं २० ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या काळात मैदानात प्रचारसभा घेणे शक्य होणार नाही. असाच पाऊस पडत राहिला तर मैदानांवर चिखल होईल आणि चिखलात सभा घेता येणार नाही. त्यामुळे एकही सभा घेता येणार नाही. म्हणूनच निवडणूक आयोगाला आम्ही रस्त्यावर सभेच्या परवानगीची विनंती केली, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. याआधीही रस्त्यावर सभा घेतल्या जायच्या. निवडणूक आयोगाकडून त्याला परवानगी दिली जायची. याचा लेखाजोखा निवडणूक आयोगाकडे आहे. ८ ते १० दिवसांसाठीच याची गरज आहे. ही फक्त मनसेसाठी मागणी नाही, तर सर्वच पक्षांसाठी ही व्यवस्था उपलब्ध करावी, असं आम्ही म्हटलं आहे, असंही नांदगावकर यांनी नमूद केलं.
