अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून लोकांना १० रुपयात सकस जेवण देऊ असं वचननाम्यात जाहीर करण्यात आलं आहे. त्यावरुन विरोधकांनी शिवसेनेवर टीका सुरु केली आहे. १० रुपये थाळी देणार असं शिवसेना म्हणते मग १२ कोटी महाराष्ट्राचं विचारतो, झुणका भाकरचं काय झालं? शिववडा त्याचं काय झालं? तरीही म्हणत असतील तर गेल्या 5 वर्षात तुम्ही काय केलं? याची उत्तर द्या असं राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सांगितलं आहे.
अहमदनगर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना कोल्हे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की,शिवसेनेच्या उमेदवारांना मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? 3 सप्टेंबरला मंत्रिमंडळात निर्णय झाला गड-किल्ले भाडेतत्त्वार देण्यात येणार. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री मूग गिळून गप्प बसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाडेतत्वावर देताना शिवसेना मूग गिळून गप्प बसणार असतील तर त्याचं उत्तर शिवसेनेने महाराष्ट्राला दिलं आहे. मग सांगा तुम्हाला मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
शिवसेनेने अनेक गोष्टींची वचननाम्यात घोषणा केली आहे. शिवसेनेने १० रुपयांमध्ये थाळीची घोषणा केली आहे. पण, भाजप पाच रुपयांमध्ये भोजन देण्याची घोषणा करू शकते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. युती झाली असली तरी, शिवसेना आणि भाजपने वेगवेगळे जाहीरनामे प्रकाशित केले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शनिवारी वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. वचननाम्यात अपेक्षेनुसार आश्वासनांची खैरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी, गरीब विद्यार्थी, महिला आणि ग्रामीण भागांवर घोषणांचा पाऊस पाडला आहे. गरिबांसाठी १० रुपयांत स्वस्त जेवणासह १ रुपयात आरोग्य चाचणीचेही आश्वासन देण्यात आले आहे. शेतक-यांच्या कर्जमुक्तीसह खतांचे दरही पाच वर्षे स्थिर ठेवण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले आहे.
दरम्यान, शिवसेनेचा वचननामा हा बनावटनामा असल्याची टीका काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शेतक-यांचा सातबारा आता कोरा करणार, तर मग पाच वर्षे झोपा काढल्या का? असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला आहे.
