कुडाळ: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. शिवसेनेने १० रुपयात सकस जेवण देणार असं आश्वासन दिलं आहे. त्यावरुन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे वचननामा पूर्ण कुठून करणार याचं बजेट कुठून आणणार? १० रुपयात थाळी देणार त्यातील नुकसान कोण भरुन देणार आणि ती मातोश्रीवर बनविणार आहे का ? उद्धव ठाकरे सातबारा कोरा करणार असं म्हणतात. त्यांना सातबारा तरी माहित आहे का? अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेवर प्रहार केलेला आहे.
तेसच शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील कटुता कधी संपणार यावरही राणे यांनी भाष्य केलं. दोन्ही बाजूने कटुता संपण्याचा विचार होत असेल तर नक्की केला जाईल. आमची बाजू मजबूत आहे. आमचा विजय निश्चित आहे असं यावेळी नारायण राणेंनी सांगितलं.
शिवसेनेने अनेक गोष्टींची वचननाम्यात घोषणा केली आहे. शिवसेनेने १० रुपयांमध्ये थाळीची घोषणा केली आहे. पण, भाजप पाच रुपयांमध्ये भोजन देण्याची घोषणा करू शकते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. युती झाली असली तरी, शिवसेना आणि भाजपने वेगवेगळे जाहीरनामे प्रकाशित केले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शनिवारी वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. वचननाम्यात अपेक्षेनुसार आश्वासनांची खैरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी, गरीब विद्यार्थी, महिला आणि ग्रामीण भागांवर घोषणांचा पाऊस पाडला आहे. गरिबांसाठी १० रुपयांत स्वस्त जेवणासह १ रुपयात आरोग्य चाचणीचेही आश्वासन देण्यात आले आहे. शेतक-यांच्या कर्जमुक्तीसह खतांचे दरही पाच वर्षे स्थिर ठेवण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले आहे.
दरम्यान, शिवसेनेचा वचननामा हा बनावटनामा असल्याची टीका काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शेतक-यांचा सातबारा आता कोरा करणार, तर मग पाच वर्षे झोपा काढल्या का? असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला आहे.
