मुंबई: शिवसेना काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत महाविकास आघाडी’करून सत्तेत आली खरी, मात्र त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या विधानाने अधिकच राजकीय पेचात सापडत आहे असंच म्हणावं लागेल. अगदी काँग्रेसमध्ये सर्वजण शांत झाले की खासदार संजय राऊत कोणत्या ना कोणत्या तरी विधानाने शिवसेनेची अडचण वाढवताना दिसत आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याला पुष्टी देणारे विधान केले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला कोणत्याही अल्पसंख्याक सदस्याचा आक्षेप नाही तर काहीही करून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायला हवे, असेच अल्पसंख्यकांच्या प्रतिनिधींचे म्हणणे होते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवारांनी नवी आघाडी कशी आकाराला आली, त्याचा उहापोह केला. यावेळी शिवसेनेसोबत आघाडी करताना भारतीय जनता पक्षाला मात्र तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून दूर ठेवा, असे सर्वांचेच म्हणणे होते, असेही पवार यांनी पुढे नमूद केले.
मागास वर्गियांसाठी अधिकारांचा योग्य वापर कसा करायचा याची नीती आपण ठरवू. यासाठी तुमच्या सर्वांची साथ मिळण्याची गरज आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना योग्य न्याय कसा मिळेल याची जबाबदारी राज्य सरकारची असेल व ती चोखपणे पार पाडण्यात येईल. pic.twitter.com/iAta2X0dZq
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 23, 2020
तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाने शिवसेनेच्या अडचणी पुन्हा वाढणार होतं. मुस्लिम समाजाने सांगितल्यामुळेच काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत आहे असं विधान अशोक चव्हाण यांनी केलं होतं. सीएए विरोधात आयोजित रॅलीत त्यांनी केलेल्या धक्कादायक विधानानंतर आता राजकारण रंगलं होतं.
नांदेडमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध कऱण्यासाठी आयोजित रॅलीत बोलताना अशोक चव्हाणांचं हे धक्कादायक वक्तव्य चांगलंच वादात सापडलं होतं. भाजप हा मुस्लिमांचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं मुस्लिम समाजाने आपल्याला सांगितल्याचा दावा त्यांनी केला होता. मुस्लिमांनी सांगितल्यामुळेच काँग्रेस राज्यात सत्तेत सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला होता.
