मुंबई : माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रचंड खळबळ उडवली. त्यांचा मोबाइल ‘स्विच्ड ऑफ’ असल्याने गूढ वाढले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका साखर कारखाना स्थळी असल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले.

शरद पवार ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यावरून घडामोडी मुंबईत घडताना अजितदादा मुंबईतच राजीनाम्याच्या तयारीत होते. त्यांच्या या हालचालींची शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या कोणासही कल्पना नव्हती. उलट, मतदारसंघातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अजित पवार तिकडे गेलेले आहेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पत्रकारांना सांगण्यात येत होते. पवारांचा गड असलेल्या बारामतीचे अजित पवार हे पाचव्यांदा आमदार आहेत. त्या आधी ते एकदा खासदारदेखील होते. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यात तेही एक आरोपी आहेत.

दरम्यान, मागील चाळीस वर्षांपासून जास्त काळ राजकारणात असलेल्या आणि समाजकारण करणाऱ्या काकांवर ईडीने गुन्हा दाखल केला त्यामुळे आपण अस्वस्थ झालो आहोत असं अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं. इतकंच नाही तर आपण राजकारण सोडून देऊ शेती किंवा व्यवसाय करु असाही सल्ला अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना दिला. ही माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या वृत्तासंदर्भात ते बोलत होते.

अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची माहिती मला पुण्याला येताना समजली. त्यानंतर मी अजित पवार यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यावेळी अजित पवार यांनी कुटुंबीयांना त्यांची अस्वस्थता बोलून दाखवली. अजित पवार म्हणाले की राजकारणाची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. आपण राजकारण सोडून देऊ त्यापेक्षा शेती किंवा व्यवसाय केलेला बरा असं अजित पवार यांनी मुलांना सांगितलं, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

राज्य सहकारी बॅंकेच्या प्रकरणात माझे (शरद पवार) नाव गोवण्यात आल्याने ते अस्वस्थ होते. आपल्यामुळे आपल्या काकांना त्रास झाल्याची भावना त्यांनी कुटुंबियांना बोलून दाखवली. ते या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडतील, असा मला विश्वास आहे. मात्र त्यांचा नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला असावा, असेही मत शरद पवार यांनी व्यक्त केली. पवार कुटुंबियांत यत्किंचितही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी आज आपल्या आमदाराकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिल्याने खळबळ उडाली. त्यानंतर पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ: शरद पवार