19 July 2019 9:38 AM
अँप डाउनलोड

राज्यात २ वर्षांत तब्बल ९७३ कारखाने बंद पडले: उद्योगमंत्री सुभाष देसाई

राज्यात २ वर्षांत तब्बल ९७३ कारखाने बंद पडले: उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : महाराष्ट्र राज्यात विविध कारणांमुळे २०१५-१६ या कालावधीत १५४ तर २०१७-१८ या कालावधीत तब्बल ८१९ कारखाने बंद पडल्याचा धक्कादायक खुलासा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. दरम्यान बंद पडलेले कारखाने पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करीत असून, वर्षभरापासून बेरोजगारीवर मात करण्यासाठी उद्योग विभागातर्फे मोठे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी सभागृहाला दिली.

महाराष्ट्रात मागील काही वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असून, २०१६ मधील नोटाबंदीच्या निर्णयामुळे लहान उद्योजक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यातील कारखाने बंद पडत असल्यामुळे परिणामी बेरोजगारीची समस्या देखील गंभीर होते आहे, महाराष्ट्रात तब्बल ५० लाख शिक्षित तरुण बेरोजगार झाल्याविषयीच्या मुद्द्यावर काँग्रेसचे सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी शुक्रवारी अर्धा तास चर्चेची सूचना विधानसभेत मांडली होती.

त्यावर उत्तर देताना उद्योग मंत्री देसाई म्हणाले की, राज्यातील बंद कारखाने पुनर्जीवित करण्यासाठी सरकार खूप प्रयत्न करत आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी मागील वर्षेभरापासून उद्योग विभागातर्फे विविध रोजगारविषयक उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्रात उद्योग विभागातर्फे एकूण ८ ठिकाणी ‘दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे’ आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात आली. सीआयआयने देखील यासाठी पुढाकार घेऊन विविध कंपन्यांना एका छताखाली आणून सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मोठ्या संख्येने तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे, असे देसाई यांनी यावेळी सांगितले.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या