नागपूर: माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी ६.५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज सकाळी ७.४० मिनिटांनी हिंगणघाट पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली.

ऑरेंज सिटी रूग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी (१० फेब्रुवारी) ६.५५ मिनिटांनी पीडितेचा रक्तदाब कमी झाला. त्यातच ह्रदयविकाराचा झटका आल्यानं तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे. पीडितेच्या मृत्युनंतर तिच्या वडिलांना दुःख अनावर झालं. “मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. ज्या वेदना मुलीला झाल्या. त्याच वेदना आरोपीला झाल्या पाहिजे. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांसारख नको, तर लवकरात लवकर न्याय हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

पीडित तरुणीच्या शरीराचा ३५ टक्क्यांहून अधिक भाग भाजला होता. तिच्या कमरेच्या वरील भाग आगीमुळे भाजल्याने श्वासनलिका, अन्ननलिकादेखील भाजून निघाली होती. त्यामुळे ही तरुणी जंतुसंसर्गाशीही झुंज देत होती. तिला ८० टक्के कृत्रिम श्वासोच्छ‌वास प्रणालीवर ठेवण्यात आले होते.

मागील सोमवारी वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. पीडित तरुणीसाठी संपूर्ण राज्यातून प्रार्थना सुरू होत्या. तसेच डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते.

 

Web Title:  Wardha Hinganghat Professor teacher burnt case victim ultimately dies.

हिंगणघाटमधील पीडित तरुणीचा अखेर मृत्यू