औरंगाबाद : सध्या देशात हिंदू मुलसमान दंगली घडतील अशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे का असा संशय व्यक्त केला जातो आहे. देशभरात आणि विशेष करून हिंदी भाषिक राज्यांच्या पट्ट्यात या विषयाला अनुसरून परिस्थिती नाजूक झालेली असताना आता याचे लोन महाराष्ट्रात देखील हळूहळू पसरू लागले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर या घटनांनी पुन्हा जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे.
कारण संपूर्ण देशात सध्या ‘जय श्री राम’ या घोषणेवरून वातावरण तापलेले दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी ‘जय श्री राम’ ही घोषणा द्या अशी सक्ती करण्यात येत आहे. अशातच औरंगाबादमधेही असाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये धार्मिक विषयाला अनुसरून चिंतेची परिस्थिती असल्याचं वृत्त आहे.
औरंगाबाद शहरातील आझाद चौक येथे मध्यरात्रीच्या सुमारास झोमॅटोचे २ डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून ऑर्डर पोहोचवण्यासाठी जात असताना परिसरातील काही अज्ञातांनी त्यांना अडवून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच या डिलिव्हरी बॉयना ‘जय श्रीराम’चे नारे लावण्यासही जबरदस्ती केली. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, औरंगाबादमध्येच काही दिवसांपूर्वी कामावरून घरी जाणाऱ्या मुस्लिम तरुणास अडवून मारहाण करत त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली होती. सदर घटना ताजी असताना पुन्हा ही घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
