
NPS Login | पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएने सेबीच्या सहकार्याने राष्ट्रीय पेन्शन योजनेशी (एनपीएस) संबंधित सदस्यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत एनपीएस सदस्यांना आता त्यांच्या एकूण गुंतवणुकीचा आणि पेन्शनचा हिशेब डिमॅट खात्यावर दिसेल. यासाठी एनपीएस खाते कंसॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंटशी (सीएएस) लिंक करण्यात आले आहे. याचा फायदा एनपीएसच्या १.३५ कोटींहून अधिक ग्राहकांना होणार आहे.
पीएफआरडीएच्या नुकत्याच जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, एनपीएस स्टेटमेंट कंसॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट (सीएएस) सोबत जोडण्यात आले आहे. सध्या, एनपीएस स्टेटमेंट वार्षिक आधारावर प्रत्यक्ष किंवा ईमेलद्वारे सदस्याला शेअर केले जातात.
सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी (सीआरए) मध्ये लॉग इन करूनही ते पाहता येईल. विशेष म्हणजे एनपीएस सुलभ करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने या लोकप्रिय गुंतवणूक योजनेत नव्या सुविधेची भर पडत आहे.
एकत्रित खाते स्टेटमेंट नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड द्वारे चालविले जाते. याअंतर्गत म्युच्युअल फंड, शेअर बाजार, गोल्ड बाँड्स, कमॉडिटी मार्केट किंवा इतर गुंतवणूक योजनांमध्ये एखाद्या व्यक्तीने केलेल्या सर्व गुंतवणुकीचा तपशील एकाच ठिकाणी दिसतो. यामध्ये बाजारातील चढ-उतार आणि गुंतवणुकीच्या रकमेत होणारे बदल रोज अपडेट केले जातात. त्याचा मासिक अहवाल संबंधित गुंतवणूकदाराला ई-मेलद्वारे पाठविला जातो. एकत्रित खात्याचा तपशील पाहण्यासाठी ब्रोकरच्या मोबाइल अॅपचा वापर केला जाऊ शकतो.
एनपीएस खाते डीमॅटशी लिंक करण्याची प्रक्रिया
1. एनपीएस सदस्य सीआरए-प्रोटॉन (https//npscra.nsdl.co.in/) च्या वेबसाइटला भेट द्या.
2. कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट (सीएएस) लिंक नवीन सेक्शनमध्ये दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर 12 अंकी प्राण आणि पॅन नंबर आणि जन्मतारीख टाका.
3. डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करा. नोंदणीकृत मोबाइल आणि ईमेल आयडीवर मिळालेला पासवर्ड प्रविष्ट करा.
4. संमती प्रक्रिया यशस्वी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल.
नाममात्र शुल्क आकारले जाणार
कंसॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट (सीएएस) द्वारे एनपीएस खात्याचा तपशील मिळविण्यासाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. पेपर कॉपी मागविल्यास १ रुपये शुल्क आकारले जाणार आहे, तर ईमेलद्वारे तपशील मागविल्यास १० पैसे शुल्क आकारले जाणार आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.