
PPF Scheme | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक अशी योजना आहे, ज्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही गुंतवणूक करू शकतो. या गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 15 वर्षांच्या लॉक-इन कालावधी आणि इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त व्याज परतावा. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास वार्षिक 7.1 टक्के व्याज दराने परतावा मिळतो. हा परतावा बँकेच्या मुदत ठेव योजनेपेक्षा बराच चांगला आहे. या योजनेत तुम्ही दरमहा फक्त 1,000 रुपये देखील गुंतवणूक केली तर पुढील 15 वर्षांत तुमच्याकडे 3.21 लाख रुपये जमा होऊ शकतात.
3000 च्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याची किमान रक्कम मर्यादा 500 रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही PPF खात्यात दरमहा 500 रुपये जमा केले तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे 1.6 लाख रुपये जमा होतील. त्याच वेळी, दरमहा 2,000 रुपये जमा केल्यास तुम्हाला 15 वर्षांत 6.43 लाख रुपये परतावा मिळेल. जर तुम्ही 3 हजार रुपये जमा करायला सुरुवात केली तर तुम्हाला 9.64 लाख रुपये परतावा मिळेल. PPF खात्यात एका आर्थिक वर्षात कमाल 1.5 लाख रुपयेच गुंतवणूक करता येते.
पोस्ट ऑफिस आणि बँकेत खाते उघडा :
तुम्ही तुमच्या नाजिकच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत किंवा बँकेच्या शाखेत जाऊन पीपीएफ खाते उघडून त्यात गुंतवणूक सुरू करु शकता. तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलांच्या नावाने देखील PPF खाते सुरू करू शकता. परंतु मुल 18 वर्षांचे होईपर्यंत काळजीवाहक म्हणून तुम्हाला खाते हाताळण्याचा अधिकार राहील. PPF नियमांनुसार, हिंदू अविभक्त कुटुंबाच्या पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक करून शकत नाही.
मॅच्युरिटीवर 5 वर्षांची मुदतवाढ :
PPF योजना खात्यावर 15 वर्षांचा लॉक इन कालावधी निश्चित करण्यात आला आहे. परंतु हा परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्यावरही तुम्ही यात गुंतवणूक सुरू ठेवू शकता. म्हणजे तुम्ही दर 5-5 वर्षांसाठी या योजनेची मुदत वाढवू शकता. तथापि योजनेचा, मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्याच्या 1 वर्ष आधी यासाठी तुम्हाला मुदतवाढीचा अर्ज करावा लागेल. तुम्ही दर 5-5 वर्षांसाठी हा मुदत कालावधी हवा तेव्हढा वेळा वाढवू शकता.
5 वर्षांचा लॉक इन कालावधी :
प्री-विड्रॉवलसाठी PPF खात्यात लॉक-इन कालावधी 5 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. म्हणजे खाते उघडल्यावर किमान 5 वर्षांपर्यंत तुम्ही या खात्यातून पैसे काढू शकत नाही. हा लॉक इन कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फॉर्म 2 भरून खात्यातील पैसे प्री-विड्रॉवल करु शकता. तथापि 15 वर्षाचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही खात्यातून पूर्ण रक्कम काढू शकत नाही.
PPF वर EEE कर सवलत :
PPF ही योजना आयकराच्या EEE श्रेणीत मोडते. म्हणजेच या योजनेत तुम्ही जी गुंतवणूक करता त्या संपूर्ण गुंतवणुकीवर तुम्हाला कर सूट मिळेल. याशिवाय गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर मिळणारी संपूर्ण परतावा रक्कमही आयकरमुक्त असेल. त्यामुळे दीर्घकालीन लाभ कमावण्यासाठी PPF योजना उत्तम गुंतवणूक पर्याय आहे.
पीपीएफ खाते जप्त होऊ शकत नाही :
कोणत्याही न्यायालय किंवा कोणाच्याही आदेशानुसार कर्ज किंवा इतर दायित्वाच्या वसुलीसाठी पीपीएफ खाते जप्त करता येणार नाही. कायदेशीर बाबतीत ही या योजनेला संरक्षण प्राप्त झाले आहे.
पीपीएफवर कर्ज :
पीपीएफ योजना खात्यातील जमा रकमेवर तुम्हाला स्वस्त दरात कर्ज देखील उपलब्ध होऊ शकते. मात्र, यासाठी तुम्हाला एका अट पूर्ण करावी लागेल. PPF खाते उघडलेले आर्थिक वर्ष सोडून पुढील वर्षापासून ते पाच वर्षांच्या कालावधीपुरताच तुम्ही PPF योजना खात्यातून कर्ज घेऊ शकता. समजा जर तुम्ही जानेवारी 2017 मध्ये PPF खाते उघडले तर तुम्ही 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2022 या कालावधी दरम्यानच कर्ज घेण्यास पात्र असाल. तुमच्या खात्यातील एकूण ठेवीवर तुम्हाला कमाल 25 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.