
Smart Investment | भारतामध्ये सरकारमार्फत गरीब आणि सर्वसामान्य प्रवर्गासाठी चालू असणाऱ्या अनेक योजना राबविल्या जातात. अशातच सरकारी नोकरी म्हणजेच सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना सेवानिवृत्तीनंतर दरमहा ठराविक पेन्शन दिली जाते. जेणेकरून उतार वयाच्या आयुष्यामध्ये इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक सरकारी कर्मचारी पेन्शन लाभासाठी पात्र असतो.
परंतु काही असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचं काय? असंघटित क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या हातात उतार वयामध्ये पैसे कोण आणून देणार? हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीसमोर आलेला असतो. जर तुमच्यासमोर सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला असेल तर, हा लेख तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला अटल पेन्शन योजनेबाबत माहिती सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तरीसुद्धा दरमहा पेन्शनचे हक्कदार बनू शकता.
असंघटित क्षेत्र :
अटल पेन्शन योजनेमध्ये असंघटित क्षेत्र म्हणजे शेतकरी प्रवर्ग, मच्छीमार, पशुपालन करणारे, विट बनवण्याच्या भट्टीमध्ये काम करणारे, मीठ मजदूर, चामड्यापासून वस्तू बनवण्याचा धंदा करणारे यांसारखे प्रवर्ग असंघटित क्षेत्रामध्ये मोडतात. यांचं हातावरचे पोट असतं. त्यामुळे शरीर जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत या व्यक्ती काम करून स्वतःचं पोट भरत असतात. परंतु म्हातारपणासाठी प्रत्येकाला स्वतंत्रपणे स्वतःच्या नावावर पेन्शन सुरू राहावी यासाठी नेमकं काय करावं हेच कळत नाही. यासाठी तुम्ही अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊन स्वतःच आयुष्य सुरळीत बनवू शकता.
अटल पेन्शन योजना :
सरकारने ही योजना 2015 साली चालू केली आहे. याआधी असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी ‘राष्ट्रीय पेन्शन योजना’ सुरू होती. परंतु सरकारने एनपीएस सेल्फ रेलियंस योजना थांबवून अटल पेन्शन योजना सुरू केली. ही 100% सरकारी योजना असल्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे सुरक्षित असण्याची गॅरंटी सरकार देतं.
एनपीएस योजनेतून अटल पेन्शन योजनेमध्ये असं करा स्विच :
तुम्ही आधीपासूनच एमपीएस योजनेतून पैसे काढत असाल तर काळजी करू नका. तुम्ही तुमचं अकाउंट अटल पेन्शन योजनेमध्ये आरामशीर ट्रान्सफर करू शकता. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पॉलिसीधारक 18 ते 40 वयोगटांमध्ये मोडत असतील त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. जर तुमचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुमचं अकाउंट अटल पेन्शन योजनेमध्ये ट्रान्सफर केलं जाणार नाही. अशा व्यक्तींना साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एनपीएस अंतर्गत सरकारी पेन्शन मिळू लागते.
अटल पेन्शन योजनेचा लाभ :
* अटल पेन्शन योजनेमध्ये पॉलिसीधारकाचे वय 60 वर्ष झाल्यावर त्याने केलेल्या योगदानानुसार दरमहा 1000 ते 5000 पर्यंत पेन्शन लागू होईल.
* प्रत्येक व्यक्तीला मिळणारी पेन्शन ही त्याच्या वयोमानानुसार आणि केलेल्या कामानुसार सूनिश्चित केली जाते.
* पॉलिसीधारकाचं अचानक निधन झालं तर, त्याच्या पत्नीला आजीवन पेन्शन मिळत राहणार. जेणेकरून वित्तीय समस्या निर्माण होणार नाही.
* पेन्शन मिळणाऱ्या दोन्हीही व्यक्ती मृत्यू पावल्या तर त्यांच्या नावावरचे पैसे नामांकित व्यक्तीला मिळतात.
* अटल पेन्शन योजनेद्वारे पेन्शन लागू होणाऱ्या पॉलिसीधारकांना पूर्णपणे टॅक्स सूट दिली जाते.