
TCS Share Price | टाटा समूहाची मुख्य होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्स कंपनीने भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसचे 2.34 कोटी शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. या शेअर्सची फ्लोअर प्राइस 4001 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच या विक्रीतून टाटा सन्स कंपनीला 9300 कोटी रुपये नफा मिळू शकतो. ( टीसीएस कंपनी अंश )
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमधील किमतीच्या तुलनेत टीसीएस शेअर्सची फ्लोअर प्राइस 3.6 टक्के स्वस्त आहे. आज मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी टीसीएस स्टॉक 3.20 टक्के घसरणीसह 4,019.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा सन्स कंपनीने टीसीएस कंपनीचे जवळपास 72.38 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मागील एका वर्षभरात टीसीएस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4254.45 रुपये किमतीवर पोहचले होते.
बाजार बंद होण्याच्या वेळी, हा स्टॉक 1.7 टक्क्यांच्या घसरणीसह 4144.75 रुपये किमतीवर आला होता. टीसीएस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15 लाख कोटी रुपये आहे. टीसीएस ही कंपनी बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे.
तज्ञांच्या मते, टाटा सन्स कंपनीने टीसीएस कंपनीच्या शेअर्सची विक्री करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो एक धोरणात्मक हालचालीचा भाग आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, अप्पर लेअर नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन कंपन्यांना स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करणे बंधनकारक आहे. हे टाळण्यासाठी टाटा सन्स कंपनीने आपले शेअर विकून निधी उभारण्याची योजना आखली आहे. मात्र, अद्याप कंपनीने याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.