मुंबई: अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदाची शिवसेनेची मागणी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याने युतीतील सत्तास्थापनेचा पेच कायम राहिला. त्यातच देशात स्थिर सरकार देणारे नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा तयार झाल्याने त्याला तडा जाईल, असे कोणतेही पाऊल न उचलण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला व सत्तास्थापनेसाठी असमर्थ असल्याचे भारतीय जनता पक्षाने राज्यपालांना कळवल्याचे समजते.

दुसरीकडे शिवसेना भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडणार असल्याचे सांगितले जाते. शिवसेना खासदार संजय राऊत सोमवारी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या चर्चेनंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडेल, असे सांगितले जाते आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढणार आहेत.

एकाबाजूला शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेवरून जवळीक वाढत असताना दुसरीकडे मुंबई काँग्रेसमध्ये एकाकी पडलेले माजी खासदार संजय निरुपम एकटेच स्वतःचा तिळपापड करून घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस पक्ष त्यांच्या विधानांची दखल घेत नसल्याने ते वारंवार प्रसार माध्यमांकडे खोडा घालणारी वक्तव्य करत आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वीच मुंबई काँग्रेसमध्ये ते एकाकी पडले होते आणि त्यानंतर त्यांचा पराभव देखील झाला. तेव्हापासून ते पक्षात एकाकी पडल्याचे चित्र होते. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा उमेदवारीसाठी त्यांना मुंबई अध्यक्षपदावर देखील पाणी सोडावं लागल्याने त्यांच्याकडे पद नाही आणि त्यात पक्ष त्यांना कोणत्याही उच्च पदावरील बैठकीत सामील करत नसल्याने ते संतापल्यासारखे बोलत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षानेही समांतर समीकरणाची जुळणी सुरू केली आहे. जयपूर येथे आज झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अनुकूलता दर्शवण्यात आल्याची माहिती पुढं येत आहे. तसं झाल्यास राज्यात काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार येण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसचे माजी खासदार निरुपम यांनी अशा प्रकारे सत्तास्थापनेस विरोध दर्शवला आहे.

काँग्रेसमध्ये एकाकी पडलेले संजय निरुपम यांचा सत्तास्थापनेवरून तिळपापड