 
						Mutual Fund SIP | मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने स्थापनेपासून म्हणजेच 24 फेब्रुवारी 2014 पासून 22.5 टक्के सीएजीआर दिला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर योजनेच्या सुरुवातीला केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक सध्या वाढून 7.66 लाख रुपये झाली आहे.
गेल्या दहा वर्षांत मिडकॅपची कामगिरी चांगली राहिली आहे. या काळात निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकाने 20.3 टक्के परतावा दिला आहे. शेअर बाजाराच्या वाईट काळातही मिडकॅपची कामगिरी चांगली राहिली आहे. मोतीलाल ओसवाल मिडकॅपचा परतावा संबंधित निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा चांगला असल्याचे फंड हाऊसचे म्हणणे आहे.
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडातील गुंतवणुकीचा उद्देश दीर्घकालीन दृष्टीकोनातून चांगल्या वाढीसाठी दर्जेदार मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणूक वृद्धी प्रदान करणे हा आहे. फंड हाऊसच्या म्हणण्यानुसार, या योजनेत 8,490 कोटी रुपयांची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) आहे आणि 185 शहरांमधील 6.09 युनिक गुंतवणूकदार आहेत.
मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने सांगितले की, या योजनेत किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग खूप चांगला असून 31 जानेवारी 2024 पर्यंत या फंडात 5.3 लाख युनिक गुंतवणूकदार होते. याच कालावधीत 3.2 लाख गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या माध्यमातून फंडात गुंतवणूक केली. एयूएममध्ये टॉप 5 राज्यांचा वाटाही 90 टक्के होता. यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल आदींचा समावेश आहे.
मोतीलाल ओसवाल एएमसीचे कार्यकारी संचालक प्रतीक अग्रवाल म्हणाले, “आम्ही चांगल्या जोखीम नियंत्रणासह पोर्टफोलिओ चालवतो. यामुळे जोखीम असलेल्या शेअर्सचा नकारात्मक परिणाम टाळत गुंतवणूकदारांचे पैसे योग्य शेअर्समध्ये जातील याची खात्री होण्यास मदत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		