इस्लामाबाद : पाकिस्तानने इस्लामिक दहशतवाद्यांविरूद्ध मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यादरम्यान पाकिस्तानी सरकारने एकूण १८२ मदरसे स्वतःच्या नियंत्रणात घेत, पाकिस्तानने बंदी घातलेल्या संघटनांशी संबधित असलेल्या शंभर दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई आम्ही योग्य नियोजन करून अमलात आणल्याचे पाकिस्तानच्या सरकारकडून सांगण्यात आले.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर प्रचंड जागतिक स्तरावरून दबाव वाढत आहे. त्यामुळे देशातील १८२ मदरश्यांवर नियंत्रण व व्यवस्थापन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सांगितले. तसेच १२१ समाजकंटकांना प्रतिबंधित कारवाई म्हणून तुरुगांत टाकण्यात आल्याचेही मंत्रालयाने सांगितले.

मदरसांमध्ये धार्मिक कट्टरतेचं शिक्षण देण्यात येत असल्यानं त्यांच्याबाबतीत काय धोरण राबवायचं ही समस्या सध्या पाकिस्तानला भेडसावत आहे. पाकिस्तानमध्ये कट्टरतेकडे झुकलेल्या मुस्लीमांचं प्राबल्य असल्यामुळे अशा धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरसांच्या माध्यमातून लाखो गरीब मुलांना भरती करण्यात आल्याचा अंदाज आहे.

जैश-ए-मोहम्मद सारख्या बंदी घालण्यात आलेल्या अनेक संघटनाही असे मदरसे चालवतात व दहशतवादाला पोषक असं शिक्षण या मुलांना देतात. इस्लामसाठी कल्याणकारी कार्ये करत आहोत असे वरवर दर्शवणाऱ्या जमात उल दावा सारख्या संघटना देशात तीनशे मदरसे चालवत आहेत, असा अंदाज आहे.

182 madrasa detained hundred terrorists detained in pakistans action