नवी दिल्ली : सबका साथ सबका विकास अशी घोषणा देत सत्तेवर विराजमान झालेला भारतीय जनता पक्ष सामन्यांना महागाईने भिकेला लावून स्वतः सर्वात धनाढ्य पक्ष बनला आहे. देशातील अनेक कंपन्यांनी आणि कॉर्पोरेट हाऊसेसने देणग्या देण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांना दिलेल्या निवडणूक देणग्यांपैकी तब्बल ८६ टक्के रक्कम म्हणजे १६७.८ कोटी रुपये एकट्या भारतीय जनता पार्टीच्या तिजोरीत जमा केले आहेत.

यातील केवळ एका ट्रस्टनेच भारतीय जनता पार्टीला तब्बल १५४ कोटी, तर काँग्रेसला केवळ १० कोटी एवढी रक्कम दिली आहे. दुसरीकडे विविध राज्यांमधील प्रादेशिक पक्षांपैकी बिजू जनता दलाला काँग्रेसपेक्षा अधिक रकमेच्या देणग्या मिळाल्या आहेत. या आर्थिक वर्षात ट्रस्टनी देशभरातील राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी एकूण २९०.२२ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी नंतर बिजू जनता दल या प्रादेशिक पक्षाला २ ट्रस्टकडून काँग्रेस पेक्षाही अधिक म्हणजे १३ कोटी रुपयांचा निवडणूक निधी मिळाला आहे असे समोर आलं आहे.

त्यामुळे देणग्या मिळण्याच्या बाबतीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष थेट तिसऱ्या स्थानावर असून, त्याच्या तिजोरीत केवळ १२ कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, जनकल्याण ट्रस्टकडून एनसीपी पक्षाला केवळ ५० लाख रुपये तर जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सला ४८ लाख रुपयांचा निवडणूक निधी प्राप्त झाला आहे.

तसेच पूर्वीची सत्या निवडणूक ट्रस्ट आता प्रूडंट निवडणूक ट्रस्ट या नावाने परिचित झाली आहे. या ट्रस्टने प्रमुखपणे भारतीय जनता पक्षाला, राष्ट्रीय काँग्रेस आणि बिजू जनता दल या ३ पक्षांना मिळून तब्बल १६९.३ कोटी रुपयांच्या निवडणूक देणग्या दिल्या आहेत. त्यात सर्वाधिक सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला तब्बल १५४.३ कोटी, राष्ट्रीय काँग्रेसला १० कोटी तर बिजू जनता दलाला ५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

bjp got highest donations for election fund than any other party in the nation