मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली तरी महाराष्ट्रात २०१४ प्रमाणे यश प्राप्त होणार नाही, असा अंदाज भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती झाली तरी युतीला ३० ते ३४ जागांवर समाधान मानावे लागेल, असे या सर्वेक्षणात पुढे आलं आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना युतीने राज्यात ४८ पैकी ४१ जागांवर यश मिळालं होतं. मात्र, पोटनिवडणुकांनंतर ४८ पैकी २२ जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेत. तर शिवसेना १८, एनसीपी ५, राष्ट्रीय काँग्रेस २ आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान पक्षाकडे १ जागा आहे.
२०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाने अंतर्गत सर्वेक्षण केले असून त्यामध्ये जागा मोठ्या प्रमाणावर कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती केली तरी दोन्ही पक्षांना मिळून ३० ते ३४ जागांवर समाधान मानावे लागेल. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली तर त्यांना १५ ते १८ जागाच मिळतील. तर शिवसेनेला मात्र ५ ते ८ जागांवर समाधानी राहावे लागेल असा अंदाज आहे.
तर राष्ट्रीय काँग्रेस-एनसीपी आघाडीला २२ ते २८ जागा मिळतील, असे या सर्वेक्षणात निरीक्षण नोंदविण्यात आले आहे आणि तसे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. मात्र या सर्वेक्षणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या एका माजी मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, शिवसेनेची भाजपकडे युतीसाठी एक प्रमुख अट आहे. त्यांना थेट मुख्यमंत्रीपद हवे असून जागांच्या आधारे मुख्यमंत्रीपद देण्यास शिवसेना अनुकूल नसल्याचे म्हटले आहे.
