नवी दिल्ली: सत्तेत आल्यावर तिहेरी तलाक कायदा आम्ही रद्द करू अशी जाहीर घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. दिल्लीत आयोजित अल्पसंख्यांक अधिवेशनात महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव यांनी ही घोषणा केली. यावेळी स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून करण्यात आलेली ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरू शकते.
दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान आज काल खूप घाबरलेले दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर भीती अगदी सहज नजरेस पडते, असं राहुल गांधी म्हणाले. ‘अच्छे दिन आणे वाले है’ अशी घोषणा आधी भारतीय जनता पक्षाची लोकं द्यायची. परंतु आता देशातील सामान्य जनताच ‘चौकीदार ही चोर है’ बोलत आहे, असा सणसणीत टोला राहुल यांनी लगावला. देशाला धर्म आणि जातीच्या आधारे तोडून पंतप्रधान होता येत नाही. जाती-धर्मांमध्ये देशाचे तुकडे पाड,पाडल्याने आणि द्वेष पसरवून देशावर राज्य करता येत नाही, हे आता मोदींच्या ध्यानात आलं आहे.
वास्तविक देशाच्या पंतप्रधानांनी लोकांना जोडण्याची भाषा करायला पाहिजे. जो देशाला तोडण्याची भाषा करेल, त्याला पंतप्रधान पदावरुन पायउतार करण्यात येईल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. मोदींचा खरा चेहरा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच देशवासियांसमोर आणला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पराभव करेल, असं राहुल गांधी म्हणाले.
