पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज तब्बल ५ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु इतका काळ उलटून सुद्धा हत्येमागील सूत्रधार मोकाटच असल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुण्यात विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी स्मारक या मार्गावर ‘अंनिस’ तर्फे ‘जवाब दो’ रॅली काढण्यात आली आहे.
या ‘जवाब दो’ रॅलीमध्ये डॉ. दाभोकरांची मुलं म्हणजे हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्यासह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, बाबा आढाव, लक्ष्मीकांत देशमुख, मेधा पानसरे अशा अनेक दिग्गजांनी जाहीर सहभाग घेऊन सरकारचा निषेध नोंदवला. त्याला सामान्यांचा सुद्धा प्रतिसाद मिळाला.
याच दिवशी म्हणजे २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. परंतु तब्बल ५ वर्ष उलटून सुद्धा मारेकऱ्यांचा सुगावा न लागल्याने विविध क्षेत्रातील लोकांकडून सरकारवर टीकेची झोड उठत आहे. त्याचाच निषेध म्हणून आज पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी ‘जवाब दो’ रॅलीचे आयोजन करण्यात आले. मागील काही दिवसांपासून अनेक धरपकड झाल्या असल्या तरी मूळ निकाल लागेपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरु ठेवण्याचा निर्णय अनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
