मुंबई : शिवसेनेने केवळ स्वार्थी आणि संधीसाधू राजकारण केलं आहे. जेव्हा २०१४ मध्ये देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट होती, तेव्हा शिवसेनेने केवळ स्वतःचा फायदा करुन घेतला. परंतु, जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत बनत गेलं तेव्हा त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली, अशा शब्दात काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
मुळात मराठी माणसासाठी शिवसेनेनं काय केलं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेने केवळ ३ पेंग्विन आणि शिववडा दिल्याचं मराठी माणसाला देखील माहित आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे किमान संधीसाधू तरी नाहीत, असं सांगत मराठी माणसाच्या विषयावरून राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे.
तसेच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर देखील मिलिंद देवरा यांनी टीका केली. त्यांनी मतदारसंघात काहीच काम केलं नसल्याने त्याचेच कार्यकर्ते आणि स्थास्थानिक लोकं देखील नाराज असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
