नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी भारतीय जनता पक्षाने ‘मैं भी चौकीदार’ मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू होताच सर्व पक्षाच्या नेत्यांनी समाज माध्यमांवर आपल्या नावाआधी चौकीदार शब्द लावला. मात्र, खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या नावाआधी ‘चौकीदार’ हा शब्द जोडला आहे. पण सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र आपण ब्राह्मण आहे, त्यामुळे नावात ‘चौकीदार’ शब्द लावू शकत नसल्याचे म्हटले आहे.

स्वामी म्हणाले की, मी माझ्या नावाच्या आधी चौकीदार शब्द लावलेला नाही. मी ब्राह्मण असून चौकीदाराने काय करायचे आहे, याचा आदेश मी देईन. अशावेळी माझ्या नावाआधी मी चौकीदार लावू शकत नाही. राफेल करारात घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेसने ‘चौकीदार चोर है’ ही मोहीम सुरू केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाने निवडणुकीत ‘मैं भी चौकीदार’ हे अभियान सुरू केले. त्यानंतर देशभरात भाजपा नेत्यांनी आपल्या नावाआधी ‘चौकीदार’ शब्द जोडला होता.

उल्लेखनीय म्हणजे सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी अनेकवेळा आपल्याच पक्षावर टीका केली आहे. विशेषत, अर्थमंत्री अरुण जेटली यांना त्यांनी नेहमीच लक्ष्य केले आहे. जेटली यांना अर्थशास्त्राची जाण नसल्याचे स्पष्टपणे म्हटले होते. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही वक्तव्य केले होते.

Loksabha election 2019 prime minster narendra modi says main bhi chowkidar subramanian swamy answered I am brahmin wont change name