कोलकाता : मोदी सरकार, सीबीआय विरुद्ध ममता बॅनर्जी सरकार ही न्यायालयीन लढाई आता अटळ आहे. देशातील स्वायत्त संस्था असलेल्या CBI ला थेट आव्हान देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उपोषणाला बसल्या आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रातील भाजपा सरकारने सीबीआयचा स्वतःसाठी राजकीय वापर केल्याचा ममतांचा आरोप केला आहे.
दरम्यान त्यांनी पुढे बोलताना अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्यात त्यांनी एक असा केला की, देशात कोणत्याही निवडणुका आल्या की CBI च्या धाडी कशा सुरु होतात. दरम्यान, काल शारदा चिटफ़ंड घोटाळ्यात कोलकाताचे विद्यमान पोलीस आयुक्त राजीवकुमार यांची चौकशी करण्यासाठी सीबीआय पोहचली होती. त्यावेळी बंगाल पोलिसांनी कोर्टाचे वारण्ट मागितले. जे सीबीआय’कडे नव्हते.
त्यानंतर सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलं. परंतु, काही वेळात त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींना फैलावर घेतलं. सीबीआयला पुढे करून राजकारण होत असल्याचा घणाघात देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी केला. एकीकडे ममता यांची भूमिका संघराज्य व्यवस्थेवरील हल्ला असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत आहेत. याउलट सत्याग्रह करणाऱ्या ममता बॅनर्जी यांना अनेक प्रमुख पक्षांनी पाठिंबा दर्शवत पश्चिम बंगालला मोदीविरोधी केंद्र बनवले आहे. यापुढे सदर वाद थेट कोर्टात जाणार असून तिथेच काही निर्णय होण्याची शक्यता आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		