मुंबई : ठाकरे सिनेमा प्रदर्शित करून प्रत्येक ठिकाणी सिनेमाला जाताना मिरवणुका काढतंच जा असे जणू काही पक्षाचे आदेशच असावे, असं चित्र सध्या अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी अनेकांनी हीच शंका उपस्थित केली होती. पक्षाचे पदाधिकारी सुद्धा कार्यकर्त्यांना आदेश देऊन सिनेमाला जाण्यास सांगत आहेत, असे ठिकाणी प्रसार माध्यमांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकदा का सिनेमा प्रदर्शित झाला की पक्ष लगेचच युतीच्या बोलणीसाठी पुढे जाऊन ‘हिंदुत्वासाठी’ आम्ही एकत्र येत आहोत, असे पारंपरिक कारण पुढे करणार असल्याचे वृत्त आहे.
एक पत्रकार, व्यंगचित्रकार ते शिवसेना प्रमुख असा वादळी राजकीय जीवन प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. परंतु, महाराष्ट्र सैनिकांनी सुद्धा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत केला आहे. यामधून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा थेट संदेश देण्यात आला आहे. तसंच संबंधित व्हिडीओच्या प्रत्येक फ्रेममध्ये बाळासाहेबांशी साम्य असणारे फोटो दाखवण्यात आले आहेत. स्वर्गीय. बाळासाहेबांचा इतिहास पाहिल्यास तो मराठी माणसासाठीच होता हे वास्तव आहे. परंतु आताची शिवसेना ही उत्तर भारतीयांचा सन्मान खुलेआम करणारी झाली आहे. तर मराठी माणूस हा केवळ गृहीत धरला जातो आणि निवडणुका येताच पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने त्याच्याकडे मतांचा जोगवा मागितला जातो.
त्यामुळेच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे हा सिनेमा आला आहे. खासदार संजय राऊत हे कितीही सांगत असले की हा सिनेमा राजकीय नाही तरीही लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जनतेला बाळासाहेबांची आठवण करून द्यायची आणि मतं मागण्यासाठी त्याचा वापर करायचा हा शिवसेनेचा छुपा अजेंडा आहे, असा आरोप सामान्यांपासून ते अनेक राजकीय विश्लेषकांनी केला आहे. तसेच आता पुढचा भाग विधानसभेच्या वेळी येतो का ते पाहावं लागणार आहे.
