मुंबई : आज निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. परंतु लवकरच राष्ट्रवादीचे अजून एक विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. आज निरंजन डावखरे यांना भाजप कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी चक्क एनसीपीचे आमदार तसेच माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आले होते.
निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील हे दोघे चांगले मित्र असून त्यांची दोस्ती अशी खुलेआम दिसल्याने अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. कारण नरेंद्र पाटील यांची विधानपरिषदेतील मुदत जुलै २०१८ मध्ये संपत आहे. पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला असता, मित्राला साथ देण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी दिली.
परंतु नरेंद्र पाटील यांच्या मैत्रीमागे वेगळंच काही तरी शिजत असल्याचं स्पष्ट जाणवत होत. त्यामुळे सध्या निरंजन डावखरे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असला तरी नरेंद्र पाटील यांचा सुद्धा भाजप प्रवेश होऊ शकतो असं बोललं जात आहे.
