लातूर : लातूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्यावर नाराज असलेले भाजप नेते रमेश कराड यांनी धनंजय मुंडे यांच्या मार्फत राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीकडून थेट लातूर विधान परिषद निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता. परंतु रमेश कराड यांनी अचानक आपली उमेदवारी परत घेत राष्ट्रवादीला आणि धनंजय मुंडेंना तोंडघशी पाडलं होतं.
तेच रमेश कराड यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश धस यांच्यासोबत ‘चाय पे चर्चा’ करण्यासाठी सुरेश धस यांच्या लातूरच्या निवासस्थानी उपस्थित होते. त्यांच्या भेटीचे फोटोसुद्धा समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले आहेत. तसेच रमेश कराड यांनी सुद्धा त्या भेटीला दुजोरा दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांच्या बाबत वक्तव्य करताना म्हटले होते की, रमेश कराडांबाबतचा निर्णय निवडणुकीपूर्वी घेऊ आणि त्या विषयाला बगल दिली होती. परंतु राष्ट्रवादी पक्ष कोणतेही कारवाई करेल या आधीच त्यांची सुरेश धस यांच्या घरी भेट झाल्याने ते पुन्हां घर वापसी करणार अशी चर्चा रंगली आहे.
