नवी दिल्ली : आधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर प्रचंड दबाव असताना त्यात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी सुद्धा भर टाकल्याचे समजते. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनीही राम मंदिराच्या निर्माणासाठी नेमकी काय पावले सरकारने उचलली आहेत, असा जाब भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी थेट संसदीय मंडळाच्या बैठकीत विचारला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नैतृत्वाची चांगलीच अडचण झाली आहे.
काल भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार उपस्थित होते. दरम्यान, उपस्थित खासदारांपैकी ३ खासदारांनी इंडियन एक्स्प्रेसला नाव न छापण्याच्या अटीवर अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर बैठकीत नेमके काय घडले, याची माहिती दिली आहे. त्या उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बैठकीच्या शेवटी सलेमपूरमधील खासदार रविंद्र कुशवाह यांनी थेट राम मंदिराचा मुद्दा मांडला. राम मंदिर बांधण्यासंदर्भात सरकारमध्ये नेमक्या काय हालचाली सुरु आहेत, असा थेट सवाल त्यांनी नैतृत्वाला विचारला. यानंतर पुन्हा युपीच्या आणि अन्य राज्यांमधील खासदारांनी सुद्धा तोच राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला. त्यानुसार खासदार हरीनारायण राजभर यांनी राम मंदिरासाठी मोदी सरकार कायदा आणणार का?, असा खडा सवाल उपस्थित नैतृत्वाला विचारला आणि सर्वच स्तब्द झाले असं वृत्त आहे.
परंतु, बैठकीच्या शेवटी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थित खासदारांना या विषयाला अनुसरून उत्तर दिले. राजनाथ सिंह यांनी खासदारांना शांत राहण्याचे आणि संयम ठेवण्याचे, असे आवाहन केले. ‘राम मंदिर हा आपल्या सर्वांसाठी भावनिक विषय असून राम मंदिर व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे, त्यामुळे आपण सरकारवर विश्वास ठेवा’, असे त्यांनी खासदारांना नम्रपणे सांगितले. दरम्यान, राम मंदिराबाबत कोणतेही ठोस उत्तर देणे मात्र राजनाथ सिंग यांनी टाळले आणि बैठक आटोपती घेण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे सुद्धा उपस्थित नसल्याचे समजते.
