मुंबई : भाजपचे आमदार आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अॅग्रो लिमिटेड या कंपनीवर ‘सेबी’ने टाच आणली आहे. सहकार मंत्री आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांच्यासह इतर तब्बल १० संचालकांवर ‘सेबी’ने भांडवली बाजारात व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सुभाष देशमुख यांचे लोकमंगल ग्रुप अंतर्गत बरेच व्यवसाय आहेत. त्यातील लोकमंगल अॅग्रो लिमिटेड हा साखर कारखान्या द्वारे सुभाष देशमुख यांनी २००९-२०१० ते २०११-२००१२ या कालखंडात सोलापूरमधील एकूण ४७३९ शेतकऱ्यांना ७२.७२ लाखांचे शेअर्स विकले होते. त्याप्रमाणे १० रुपयावर प्रत्येक शेतकऱ्यांनी ७२.७२ कोटी रुपये सुभाष देशमुख यांच्या कंपनीला दिले. परंतु कंपनीच्या भागदाराक शेतकऱ्यांना परतावा मिळत नव्हता, त्यामुळे त्याच शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून ‘सेबी’ने लोकमंगल अॅग्रोला कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती.
सेबीच्या त्या नोटीसला उत्तर देताना कंपनीने म्हटलं आहे की, राज्यात दुष्काळामुळे ऊस उत्पादन कमी झाले आणि लोकमंगल कारखाना संकटात आला असं कळवलं. पण खरं म्हणजे लोकमंगल कंपनीने त्याच शेतकऱ्यांच्या पैशात इमारती उभ्या केल्या तसेच जमीन खरेदी केल्या असून त्याची गुंतवणुकीची किंमत तब्बल १०८ कोटी इतकी आहे. त्यामुळे ही भागीदाराक शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचा ठपका ठेवत सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) लोकमंगल कंपनीवर निधीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे.
सेबीच्या त्या निर्बंधानुसार कंपनीच्या सर्व संचालकांना सेबीच्या परवानगीखेरीज भांडवली बाजारात लोकमंगल कंपनीच्या नावे अथवा वैयक्तिक स्वरूपात कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. तसेच कंपनीचे सर्व डी-मॅट खाती, शेअर्स आणि गुंतवणुकीची माहिती सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) जमा करावी लागेल. एकूणच यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आले आहेत.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		