पुणे : काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत घरवापसी करणाऱ्या माजी आमदार विनायक निम्हण आयोजित कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती आणि मी वाघाच्या पाठ थोपटण्यासाठी आल्याची स्तुतिसुमनं उधळली होती. परंतु आज जेव्हा तेच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आले असता विनायक निम्हण यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.
सेनेचे माजी शहर प्रमुख व माजी आमदार विनायक निम्हण हे आता मनगटावरील ‘शिवबंधन’ तोडून सेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. कारण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विनायक निम्हण पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. विनायक निम्हण हे सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचे समजते. पुण्यात सेनेला राजकीय वातावरण पोषक नसून आणि काँग्रेसला तोडीचा उमेदवार गरजेचा असल्याने ते काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीला लागले आहेत अशी चर्चा आहे.
त्यांचा काँग्रेस प्रवेश हा जवळजवळ निश्चित झाल्याची चर्चा संपूर्ण पुण्यात रंगली असली तरी काँग्रेस कडून अजून कोणतीही अधिकृत बातमी आलेली नाही. त्यामुळे शिवसेनेला लोकसभा निवडणुकीच्या आधीच धक्का बसण्याची चिन्ह आहे. निम्हण याआधी दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसमधून पुन्हा घरवापसी झाल्याने उद्धव ठाकरेंनी त्यांना पुण्याच्या शहरप्रमुखपदाची जबाबदारी दिली होती. पुण्यातील शिवसेनेला ताकद देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता, परंतु पुण्यात पुन्हा सेनेला धक्के बसण्याची शक्यता आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		