नवी मुंबई : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उत्तर भारतीय समाजाचे गोडवे गाण्यास सुरवात केली आहे. मराठी माणसासाठी एकही उच्चार न करता त्यांनी केवळ उत्तर भारतीयांचे आणि शिवसेनेच्या अतूट नात्याचे दाखले नवी मुंबईतील आयोजित कार्यक्रमात दिले आहेत. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेने कधीही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास दिला नाही.

दरम्यान, वाघाचे दाखले देणाऱ्या एकनाथ शिंदेंना थेट मनसे पक्षाचं नाव घेऊन भाषण करण्याची हिम्मत झाली नाही. त्यामुळे ते मनसेचा थेट नामोल्लेख टाळत म्हणाले की, ‘ठाण्यामध्ये एका पक्षाने उत्तर भारतीयांना खूप त्रास दिला, त्यांच्या गाड्या फोडल्या, त्यांच्या व्यवसायाची दुकाने तोडली, त्या वेळेस शिवसेना उत्तर भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे उत्तर भारतीय समाज शिवसेनेच्या बाजूने उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केले आहे.

नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे भाषणादरम्यान म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे अनेक नगरसेवक हे उत्तर भारतीय आहेत. अयोध्येत उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. त्यावेळी उत्तर भारतीयांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रचंड आकर्षण, आस्था आणि श्रद्धा असल्याचे दिसले.

उत्तर भारतीयांसोबत कोणताही गंभीर प्रसंग ओढवला तर मदतीसाठी सर्वात प्रथम धावून येणारा पक्ष म्हणजे शिवसेना असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे उत्तर भारतीय समाजाबरोबर सर्वच समाज शिवसेनेबरोबर जोडले गेले असल्याचे शिंदे म्हणाले. शिवसेना जात, पात, धर्म मानणारा पक्ष नाही, तर सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे हे आता सर्वांना कळले असल्याने नवी मुंबईतील सर्व समाज शिवसेनेच्या बाजूने उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच शिवसेनेची पंढरपूर येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जंगी सभा झाली. शिवसेना सत्तेत जरी सामील असली, तरी जेव्हा कधी जनतेचे प्रश्न येतात तेव्हा सत्ता, सरकार बाजूला ठेवून शिवसेना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःला झोकून देते असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळेच नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदार संघासह ठाणे जिल्ह्यावर सुद्धा शिवसेनेचं निर्विवाद साम्राज्य आहे.

thane city shivsena have many north indian corporators and so we are with north indians says ekanath shinde at navi mumbai