मुंबई : एनसीपीचे ज्येष्ठ नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेनेने सामना उभा मुखपत्रातून जहरी टीका केली आहे. अजित पवार टीका करताना उद्धव ठाकरे यांना म्हणाले होते की, यांच्या काय तर म्हणे २५ तारखेला अयोध्येला जाणार. काय तिथं दिवा लावणार तिथे! अरे तुला सत्ता असताना तुझ्या बापाचं स्मारक ५ वर्षात करता आलं नाही. आणि तिथं अयोध्येला जाऊन काय करणार आहे?, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. दरम्यान, अजित पवारांची ती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागल्याचे जाणवते आहे.
आजच्या सामानामधील अग्रलेखात अजित पवारांना बोचऱ्या आणि विखारी शब्दांमध्ये उत्तर देण्यात आलं आहे. त्यात अजित पवारांवर टीका करताना हलक्या दर्जाचे शब्द वापरण्यात आले आहेत. सामनातील अग्रलेखात म्हटलं आहे की, अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात. एनसीपी हा आज सुद्धा शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही. अयोध्येत राममंदिरास विरोध हेच त्यांचे धोरण आहे. दरम्यान, अजित पवारांनी प्रभू श्रीरामाचाही अपमान केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा अपमान केला. अशा नरा मोजुनी माराव्या पैजारा, हजार माराव्यात व एक मोजावी असे जे संतांनी सांगितले आहे, त्याची अंमलबजावणी महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका सामनातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
काय आहे आजचा सामनामधील अग्रलेख?
- अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेस हा आजही शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे.
- अजित पवारांनी ‘५५ दिवस उपोषण करूनही पाणी मिळाले का? पाणीच नाही तर काय मुतायचं का?’ अशा प्रकारची निर्लज्ज भाषा वापरून समस्त दुष्काळग्रस्तांना अपमानित केले होते.
- काय रे बारामतीच्या गटारी किडय़ा, तू तुझ्या छंदाचे प्रदर्शन उघडपणे करू शकशील काय?’’ यावर महाराष्ट्राच्या जनतेने घराघरात हशा आणि टाळ्यांचा कडकडाट केला.
- अजित पवार व त्यांच्या टोळीने ७०-८० हजार कोटींचा जलसिंचन घोटाळा केला नसता तर आजच्या दुष्काळ निवारणासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असता.
- अजित पवारांच्या नेतृत्वाखाली कुणी जलसंधारणाची लूट केली, कुणी बँका बुडवल्या, कुणी साखर कारखाने भंगारात काढले व महाराष्ट्रच भंगारात काढून शिवरायांच्या महाराष्ट्राची वाट लावली.
- दीड दशके राज्याची सत्ता भोगीत असताना ‘मराठा समाजाच्या आरक्षणावर’ त्यांनी त्यांच्या मुतऱ्या तोंडातून शब्द काढला नाही
- विधानसभेचे निकाल जाहीर होताच पहिल्या तासात कुणी शेणात तोंड घातले असेल तर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेच.
- भाजपच्या टांग्यात चढून ‘तुम्ही सरकार बनवा आम्ही पाठिंबा देतो,’ असे प्रफुल पटेल सांगत होते तेव्हा त्या टांग्यात चढून अजित पवारांनी पटेलांना खाली खेचले असते तर आम्ही त्यांच्या हिमतीस दाद दिली असती
- ७० हजार कोटींच्या घोटाळ्यात सहीसलामत सुटण्यासाठी भाजपचे जोडे पुसण्याची करसेवा केली.
- अजित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘टाकाऊ’ माल आहे. विखेपाटील व अजित पवार यांचा रोख खरे तर भाजप सरकारवर, त्यांच्या घोटाळ्यांवर हवा, त्यांच्या अकार्यक्षमतेवर हवा.
- भुजबळांच्या बाजूच्या कोठडय़ा तयार आहेत असा दम मुख्यमंत्र्यांनी देताच हेच पवार, विखेपाटील अनेक महिने कोमात गेले होते.
