नवी दिल्ली : जेट एअरवेज ही कंपनी सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. ही आर्थिक अडचण सोडवण्यासाठी मदतीला सरकारी बँका धावून आल्या, हे पाहायला फार छान वाटलं, परंतु अशीच मदत किंगफिशर एअरलाईन्सच्या आर्थिक अडचणीवेळी का करण्यात आली नाही, असा सवाल उद्योगपती विजय मल्ल्याने उपस्थित केला आहे. विजय मल्ल्याने ४ ट्विट करत जेट एअरवेज आणि किंगफिशर एअरलाईन्सला वेगळा न्याय का, असा प्रश्न विचारला आहे.

मी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहिलेली पत्र भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जाहीरपणे वाचून दाखवतात. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात सरकारी बँका यूपीएच्या दबावाखाली होत्या, असा आरोप करतात. सध्याच्या पंतप्रधानांना पत्र लिहिल्यावर माध्यमं माझ्यावर टीका करतात. मग भाजपप्रणीत एनडीए सरकारच्या काळात नेमकं बदललंय काय? असा प्रश्न मला पडतो, असे म्हणत त्याने सरकारवर टीका केली आहे. तसेच ‘किंगफिशर एअरलाईन्स वाचवण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. मात्र तरीही मला मदत करण्याऐवजी टीकाच करण्यात आली. कर्नाटक उच्च न्यायालयाला माझ्या संपत्तीचा, मालमत्तेचा तपशील दिला होता, बँका आणि देणेकऱ्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मी हे पाऊल उचललं होतं. मग बँकांनी मी देत असलेली रक्कम का घेतली नाही? असा सवाल त्याने केला आहे.

Why double stand under nda vijay mallya alleges says over jet airways issue