पुणे: राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच आहे, आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही चर्चा अर्धवट सोडत बळिराजाच्या बांधावर धाव घेत त्याच्या व्यथा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपत्तिग्रस्त भागांना भेट दिली. अन्य मंत्र्यांनीही तोच कित्ता गिरवला मुख्यमंत्री फडणवीस हे आज दिल्लीला जाणार असून, एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उद्याच कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतील. यामुळे आता या सत्तेच्या पेचप्रसंगात थेट पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हस्तक्षेप करून कोणता तोडगा काढू शकतात, याकडे सर्वांचेच लक्ष दिल्लीकडे लागले आहे.
राज्यात भारतीय जनता पक्षाचे नाही तर शिवसेनेचेच सरकार येणार असा दावा एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे आमदार फोडले तर पोटनिवडणुकीत आम्ही पाठिंबा देऊ आणि शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून आणू असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आता जयंत पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
दुसरीकडे, निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर सेना-भारतीय जनता पक्षामधील सत्तासंघर्षात एनसीपी’ची भूमिका महत्त्वाची ठरेल असं म्हटलं जात होतं. त्यातच सेनेला जर एनसीपीने पाठिंबा दिला तर भाजपला सर्वाधिक जागा मिळवूनही सत्तेबाहेर बसावं लागेलं. पण एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण विरोधीपक्षातच बसू. सत्ता स्थापनेचा कोणताही विचार नाही असं म्हटलं होतं. मात्र, खासदार सुनील तटकरे यांनी एनसीपी शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. महायुतीला बहुमत मिळूनही त्यांनी सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाही. तसेच गेल्या पाच वर्षांत त्यांच्यामध्ये जसे वाद होते त्यापेक्षा अधिक वाद आता आहेत असं खासदार सुनील तटकरेंनी सांगितलं.
