मुंबई, २० ऑगस्ट | १३ जुलै, १६६० बाजीप्रभूं देशपांडे दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत एका तलवारीचं टोक जमिनीत रोवून उभे होते. तर दुसरी तलवारीची सैल होत चाललेली मुठ घामाने भिजलेल्या पाचही बोटानी आवळून धरली होती.
पहाटे पासून भरून आलेले आकाश शेवटी एकदाचे टप-टप करून टप्पोरे थेंबाने जोरदार वादळी वाऱ्यासह बरसण्यास सूर्वात झाले. बाजीप्रभूंचं लक्ष खिंडीत दऱ्या-खोऱ्यातून वाहत येणाऱ्या पाण्याकडे गेले आणि त्या पाण्याबरोबर वाहत आलेल्या ५-६ सापांच्या झुपक्याकडे सुध्दा. ते साप आधार म्हणून बाजीप्रभूंच्या पायाचा आधार घेऊ लागले. पण आधीच रागात असलेल्या बाजींनी त्या सापांना तलवारीने सपासप मारून टाकले. पण त्यांच्या लक्षात आले की रागाच्या भरात मी हे काय केले शिवाय ते केवळ आधारासाठी माझ्या पायाला येऊन जखडले होते. त्यातले एक सापाचे पिल्लू अजून बाजींच्या पायाला जखडून होते. बाजींनी त्या सापाच्या पिल्लाल अलगद उचलले आणि त्या सापाला स्वतः च्या काना भोवती वेटाळून गुंडाळून ठेवत त्या सापाच्या पिल्लाला म्हणाले; “तुम्हाला आणि माझ्या महाराजांना सुखरूप ठेवण्याची जबादारी आजपासून माझी!”
कारण; अजून विशाल गडावरून तीन तोफांचा आवाज आला नव्हता.”
बाजीप्रभूं देशपांडे….पावनखिंडीत शत्रूचा थरकाप उडवणारा पराक्रमी योद्धा (Baji Prabhu Deshpande Pawankhind war in Marathi) :
ओंजळीत येईल तितके पाणी सर्व मावळे पियू लागले. कारण कधी प्यायलेले पाणी कधीच आटून गेलेले. घोडखिंडीतून सिद्दी जौहरचे सैन्य खिंडीत प्रवेश करतच होते. कितीतरी जणांना धारातीर्थी पाडले तरी सैन्य थांबायचं नाव काही घेत नव्हतं. बाजीप्रभूंनी डोक्यावरून एक हात फिरवला आणि आपले जेमतेम कमी कमी होत चाललेल्या ३०० मराठे सैन्याची दशा पाहू लागले. शेवटी सिद्दीच्या हजारो सैन्यापुढे कितपत ३०० मराठे सैन्य टिकणार! तरीसुद्धा विरोध सुरू होता, खिंड लढवत होते, एक एक मावळा ५०-६० दुश्मनाच्या सैन्याला मारून मगच प्राण त्यागत होता. दुपारचा प्रहर चालू होता आणि समोर दुश्मनाचा एकसारखा सतत न थांबणार प्रहारही!
बाजीप्रभूं स्वतः च्या मनाशीच म्हणू लागले, “अवघड आहे आता! सगळीकडून अवघड होऊन बसलय… दुश्मनाचं सैन्य थांबायचं नाव घेत नाही आहे… महाराज विशालगडावर पोहचल्यावरच मी ही खिंड जिंकलो असं समजेन. प्राणाची चिंता आहे कोणाला येथे…आज न उद्या जाणारच आहे…पण काहीही झाले तरी सिद्दीच्या सैन्याला पुढे जाऊ देणार नाही! मरण यायला अजून विलंब होता कारण; अजून विशाल गडावरून तीन तोफांचा आवाज आला नव्हता.”
बाजीप्रभूंनी (Baji Prabhu Deshpande) जमिनीवर वाकून मुठभर माती हातात घेऊन कपाळावर लावली. दोन्ही तलवारिंची टोके जमिनीवर आपटली आणि हवेत फिरवून पुन्हा खिंडीच्या मुखाशी गेले आणि येईल त्या दुश्मनाच्या सैन्याला तलवारीच्या वाराने धारातीर्थी पाडू लागले. बाजीप्रभू व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. जोपर्यंत महाराज विशालगडावर पोहचून तोफांच्या इशाऱ्याने पोहचल्याची शाश्वती देत नाही तोपर्यंत खिंड लडवत राहणे भाग होते. कारण; अजून विशाल गडावरून तीन तोफांचा आवाज आला नव्हता.
बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. सतत वाढत राहणारं सैन्य आणि सतत चालत राहिलेली बजींची तलवार दोन्ही थांबायचं नाव घेत नव्हतं. त्यातल्या एका दुश्मनाने बाजीप्रभूंवर वार केलाच परंतु बाजींच्या विरोधात काही एक फरक पडला नाही. बाजीप्रभू जराही डगमगले नाही. परंतु कमी कमी होणाऱ्या मराठे मावळ्यांमुळे सगळा शत्रू फक्त बाजींवरच तुटून पडलेलं दिसत होतं. तरीही बाजींच्या दोन्ही तलवारी सतत लढा देत होत्या. कारण; अजून विशाल गडावरून तीन तोफांचा आवाज आला नव्हता.
दुष्मन आता एकमेकांत कुजबुजू लागले; “अरे वो बाजी है ना उसको पहले मारना पडेगा!”
तेव्हड्यात बंदूकधारी बोलावण्यात आले. लांबून तो बंदूकधारी सिद्दीच्या सैन्यातील प्रमुखास विचारू लागला की; “इस में बाजीप्रभू कौन है?!”
सैन्यातील प्रमुख म्हणाला,”अरे जो विशाल, शक्तिशाली और सबको भारी पड रहा है ना वही बाजी है!”
बंदूकधारीला केलेल्या वर्णनाने बाजी दिसला. बजींवर बंदुकीचा वार करण्यात आला तर दुष्मन तुटून पडले. बाजींचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले तरी दोन्ही तलवारी चालूच होत्या. कारण; अजून विशाल गडावरून तीन तोफांचा आवाज आला नव्हता.
सिद्दी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते.
शेवटी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एका बंदूकधारीने गोळी झाडली ती बाजींच्या छातीत घुसली आणि एका तोफेचा आवाज विशाल गडावरून ऐकू आला.
पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. दुसरी गोळी बाजींना लागली तेव्हा दुसऱ्या तोफेचाहीं आवाज झाला.
तिसरी गोळी झाडली गेली तीही बाजींच्या शरीरात घुसली आणि तिसऱ्या तोफेचा आवाज ही झाला.
तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजीप्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले….
…कारण; विशाल गडावरून तीन तोफांचा आवाज आला होता.
बाजीप्रभूंची तलवार हातातून सुटली नव्हती तर केवळ हात जमिनीवर पडला होता. केवळ श्वास निघून गेला होता पण अजून हृदयाच्या नसांतून रक्त वाहत होतं. केवळ डोळे बंद झाले होते पण जीव अजून त्यांचा गुंतला होता. जो केवळ आणि केवळ महाराजांत, स्वराज्यातील लढ्यात! आतापर्यंत बाजीप्रभूंच्या कानाला लपेटून बसलेले ते सापाचे पिल्लू आता हळूच जमिनीवर उतरले आणि सुखरूप त्या पावन खिंडीतून निघून गेले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Story Title: Baji Prabhu Deshpande Pawankhind war in Marathi.
