मुंबई : शिवसेनेच्या स्वबळाचा नारा आणि त्यामुळे भाजपची झालेली राजकीय गोची आता स्पष्ट दिसू लागली आहे. भाजपा शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही पक्षांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा आघाडीला होईल. त्यामुळे भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांचा आगामी निवडणुकीत पराभव होऊ शकतो असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंदूस्तान टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केलं आहे.

आगामी निवडणूका स्वबळावर लढविण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित होणार, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवसेना हा भाजपचा जुना मित्रपक्ष असून दोन्ही पक्षांची विचारधारा एक समानच आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेला युतीसाठी हात पुढे केला आहे. अमित शहा यांच्या मातोश्री भेटीनंतर राज्यातील भाजपचे नेते शिवसेनेबाबत नरमाईची भूमिका घेत आहेत.

भाजप आणि शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला होईल आणि त्यामुळे शेवटी भाजपा शिवसेना या दोन्ही पक्षांचा पराभव होईल. त्यामुळे युतीत राहून निवडणूका लढविल्यास दोन्ही पक्षांचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. भाजप सुद्धा स्वबळावर लढण्यास तयार आहे. आमचा केवळ २- ३ जागेवर पराभव होईल. पण राष्ट्रीय स्तरावर युती अभेद्य ठेवण्याची गरज आहे. तसेच कितीही झालं तरी शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे, असे फडणवीस यांनी आवर्जून सांगितलं.

शिवसेनेची युतीसाठी मन कस वळवणार या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, राजकीय स्थितीच लोकांना युतीसाठी तयार करते. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे कट्टर विरोधक एकत्र येतील असे कधी कोणाला वाटले होते का?. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीने काँग्रेसशी फारकत घेतली होती. पण वर्षभरातच दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. त्यामुळे शिवसेनेसोबतच्या युतीबाबतही ते शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

BJP and Shiv sena will lost election due to non alliance