मुंबई : सध्या मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आज ‘संवाद यात्रा’ आयोजित केली आहे. आज मुंबईमध्ये थेट विधान भवनावर धडकणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक मुंबईमध्ये विधानभवनावर धडक देणार आहेत.

परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून संवाद यात्रेसाठी निघालेल्या अनेक आनंदोलकांची आधीच धरपकड सुरु करण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर अशा विभागामधून येणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चातर्फे प्रसार माध्यमांसमोर करण्यात आला आहे.

केवळ मागासवर्ग आयोगाचा अहवाल महाराष्ट्र राज्य सरकारला सादर झाला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळाले, असा गैरसमज पसरवला गेल्याचे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे १६ नोव्हेंबरपासून मराठा समाजाचे प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्यासाठी “संवाद यात्रा” आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हजारो आंदोलकांसह ही संवाद यात्रा आज हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने राज्य विधान भवनावर धडकणार आहे. परंतु, त्याआधीच पोलीस यंत्रणेने ती असफल करण्यासाठी हालचाली सुरु केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या संवाद यात्रेच्या अनुषंगाने मुंबई-अहमदाबाद नॅशनल हायवेवरील वसई ते दहिसर दरम्यान असलेल्या वर्सोवा येथील नवीन पुलाचे दुरुस्ती काम उद्या करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे.

maratha reservation demand kranti morcha samwad yatra at mumbai during maharashtra assembly winter session