मुंबई : गोरेगावच्या नागरी निवारा परिषदेच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावर लागलेल्या आगीवर जवळपास ६ तासांनतर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे. काल रात्रीच्या अंधारात अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. आजूबाजूच्या सुकलेल्या वृक्षांमुळे ही आग आजूबाजूच्या ३ ते ४ किलोमीटर परिसरात पसरल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
काल आग लागल्याची बातमी मिळताक्षणीच संध्याकाळपासून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल १० गाड्या, ७ पाण्याचे टँकर आणि ३ जलद प्रतिसाद वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. दरम्यान, ही आग पसरू नये यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन कर्मचाऱ्यांकडून सुद्धा प्रयत्न करण्यात येत होते. रात्री उशिरा पर्यंत काळोखात अडचणी येत असल्याने अग्निशमन दलाच्या काही गाड्या स्टॅण्डबाय मोडमध्ये सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, हा डोंगर खासगी विकासकाच्या ताब्यात असल्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून सांगण्यात स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, ही आग केवळ तेवढ्या भागापुरती सीमित न राहता पुढच्या बाजूला असलेल्या वन विभागाच्या हद्दीत सुद्धा पसरली होती, असे स्थानिकांनी निदर्शनास आलेल्या माहितीच्या आधारे सांगितले. असं असलं तरी जंगलातील आगीबाबत कोणताही अंदाज वर्तविणे शक्य नसते. केवळ लागलेली आग पसरू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करणेच हाच एकमेव उपाय असतो’, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक आणि संचालक अन्वर अहमद यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
