बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सत्तास्थापनेवेळी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार पाहायला मिळाला होता. दरम्यान, कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापन केलं होत. परंतु, बहुमत सिद्ध करता येणे शक्य नसल्याचे कळताच केवळ दीड दिवसांतच येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते.

तर दुसरीकडे सर्वात कमी जागा असून सुद्धा जेडीएसच्या कुमारस्वामी यांच्या नशिबी मुख्यमंत्रीपद आलं होतं. परंतु, आता पुन्हा कर्नाटकमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या फेरबदलानंतरच या सर्व हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. कारण मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज होणाऱ्या काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांना गळाला लावून सरकार पाडण्याचे प्रकार होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार उमेश कट्टी यांच्या एका विधानामुळे कर्नाटकमधील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला आहे. आमदार कट्टी यांनी विधान केलं होतं की, काँग्रेस-जेडीएस पक्षातील एकूण १५ नाराज आमदारांच्या मी थेट संपर्कात आहे. जर, ते तिथे नाराज असतील आणि भाजपात येऊ इच्छित असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे कट्टी यांनी म्हटले. त्यानंतर याचर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. उमेश कट्टी हे कट्टर भाजपा समर्थक असून ते तब्बल ८ वेळा भाजपाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी मात्र हे वृत्त फेटाळले आहे. भाजपा कुठल्याही विद्यमान काँग्रेस आमदाराच्या संपर्कात नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर काँग्रेसनेही उमेश यांचा हे विधान केवळ संभ्रम पसरवण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.

bjp trying to conveyance some congress and jds mlas to form own government