मुंबई : आज सलग चौथ्या दिवशीसुद्धा बेस्ट कामगार संघटनेचा संप सुरूच आहे. त्यात महापालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये मागील ४ दिवस केवळ चर्चा सुरू असून सुद्धा काेणताही ताेडगा निघू शकलेला नाही.
दरम्यान, बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची अनेक वर्षांपासून सत्ता आहे. त्यांचे बेस्ट उपक्रमावर आणि आयुक्तांवर अजिबात नियंत्रण नाही. प्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने तोडगा निघेल असे वाटत हाेते. परंतु, कामगारांच्या मागणीपत्रावर प्रशासनाकडून तोडग्यावर प्रस्तावच नाही, मग बेस्ट कर्मचाऱ्यांनी चर्चा आणि तडजाेड तरी कशावर करायची असा प्रश्न पडला आहे.
वास्तविक या संपात मुंबईकर भरडला जात आहे. त्यात गुरूवारी पार पडलेल्या मॅरेथॉन चर्चेनंतरही बैठक निष्फळ ठरली. यामुळे बेस्ट कामगारांचा गिरणी कामगार हाेण्याची भीती आता बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केली आहे.
