पाटणा : प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील सक्रीय प्रवेशानंतर राजकीय वर्तुळातून आणि विशेष करून भारतीय जनता पक्षातून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. दरम्यान, बिहार सरकारमधील भाजपचे विद्यमान मंत्री विनोद नारायण झा यांनी केलेल्या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्रियांका गांधींबाबत प्रतिक्रिया देताना विनोद नारायण झा म्हणाले की, ‘प्रियांका गांधी या सुंदर आहेत, पण केवळ सौंदर्याच्या आधारावर मतं मिळत नाहीत, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केल्याने भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे. प्रियांका गांधी सुंदर असल्यानं काँग्रेसनं त्यांना राजकारणात उतरवलंय. मात्र त्यांचं राजकारणात काडीचं सुद्धा योगदान नाही. त्याउलट जमीन घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांत अडकलेल्या रॉबर्ट वाड्रा यांच्या पत्नी हीच त्यांची ओळख आहे,’ असं झा म्हणाले. दरम्यान, विनोद झा यांच्या विवादास्पद वक्तव्याचा कॉंग्रेसने सुद्धा समाचार घेतला आहे.
काँग्रेस नेते प्रेमचंद्र मिश्रा यांनी याबाबत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘महिलांविषयी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मनात जराही आदर नाही. असं बोलण्यापूर्वी विनोद झा यांनी स्वत:च्या कुटुंबातील महिलांचा विचार करायला हवा’, अशी खरमरीत टीका काँग्रेसने केली आहे.
