मुंबई : सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा काँग्रेसने एनसीपीला द्यावी आणि एनसीपीकडून निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी, असा नवीन प्रस्ताव समोर आला आहे. सदर जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडली तर जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावी, असा देखील प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे.
रावेरची जागा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीकडे मागितली आहे. त्या बदल्यात सिंधुदुर्ग- रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला सोडली जाऊ शकते. रावेरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत, तर सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा शिवसेनेचे विनायक राऊत यांच्याकडे आहे. निलेश राणे २००९ मध्ये या मतदारसंघातून विजयी झाले होते, पण २०१४च्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य असलेले नारायण राणे यांचे निलेश हे पुत्र आहेत. निलेश यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली तर नारायण राणे काय भूमिका घेतील हे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		