भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देशाचे सैन्य दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना कमलनाथ यांनी हे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पँट घालायला शिकले नव्हते तेव्हा जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधींनी देशाच्या सैन्यदलांची उभारणी केली असे कमलनाथ म्हणाले.
खांडवा जिल्ह्यातील हरसूद येथील सभेमध्ये ते बोलत होते. मोदी जेव्हा तुम्ही पायजमा, पँट घालायला शिकला नव्हता तेव्हा जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधींनी लष्कर, नौदल आणि हवाई दलाची देशासाठी निर्मिती केली. आता तुम्ही म्हणता देश तुमच्या हातात सुरक्षित आहे असे कमलनाथ म्हणाले.
कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांवर आयकर खात्याने छापे मारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एका सभेमध्ये भ्रष्टनाथ असा त्यांचा उल्लेख केला होता. त्याला कमलनाथ यांनी रविवारी उत्तर दिले. मागच्या आठवडयात कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांची घरे आणि कार्यालयांवर मारलेल्या छाप्यांमधून आयकर खात्याने १४.६ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड, डायरी आणि फाईल्स जप्त केल्या.
