
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपल्या इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
मात्र इलेक्ट्रिक कारच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय कंपनीच्या शेअरधारकांना फारसा आवडलेला नाहीये. त्यामुळे टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्री पाहायला मिळाली होती. आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.67 टक्के वाढीसह 913 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत कपात करण्याची बातमी येताच टाटा मोटर्स कंपनीचे शेअर 2 टक्क्यांच्या घसरणीसह 906.85 रुपये किमतीवर आले होते. टाटा मोटर्स कंपनीने आपल्या Nexon आणि Tiago EV कारची किंमत अनुक्रमे 1,20,000 रुपये आणि 70000 रुपयेने कमी केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3 लाख कोटी रुपयेपेक्षा अधिक आहे.
कोणत्याही वाहन निर्मात्या कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक कारच्या किमतीत एवढी मोठी कपात करण्याची ही पहिलीच वेळ असेल. अर्थातच यामुळे अनेक ग्राहक कंपनीचे नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी आकर्षित होतील. टाटा मोटर्स कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन युनिटने मंगळवारी माहिती दिली की, त्यांच्या Nexon आणि Tiago EV ची किंमत स्वस्त होणार आहे. या कारच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी सेलच्या किमतींमध्ये बरीच घसरण पहायला मिळाली आहे. त्यामुळे कंपनीने हा फायदा आपल्या ग्राहकांना ही देण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा मोटर्स कंपनी आपल्या प्रवासी इलेक्ट्रिक मोबिलिटी विभागातील सर्वात जास्त विकली जाणारी Nexon.ev ही कार 14.49 लाख रुपये किमतीवर विकणार आहे. त्याच वेळी कंपनीने मोठ्या श्रेणीतील Nexon.ev कारची किंमत 16.99 लाख रुपये निश्चित केली आहे. टाटा मोटर्स कंपनीने आपल्या Tiago या स्मॉल इलेक्ट्रिक कारची किंमत देखील 70,000 रुपये कमी केली आहे. आता ही कार 7.99 लाख रुपये किमतीवर विकली जाणार आहे.
मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 105 टक्के वाढवले आहे. मागील तीन वर्षांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 190 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.