मुंबई: जागतिक अर्थव्यवस्थेवर असलेले मंदीचे सावट, जागतिक बाजरापेठेतील घसरण याचा फटका हिंदुस्थानी शेअर बाजारालाही बसला आहे. दुपारी २ वाजेनंतर निर्देशांक ६७० अंकांनी घसरला. दिवसभरातील कामकाज संपले त्यावेळी निर्देशांकाने ६४२ एवढी घसरण घेत 36,481.09 वर बाजार बंद झाला. तर निफ्टीमध्ये १८६ अकांची घसरण होऊन तो १०,८१७.६० वर बंद झाला.
सौदी अरेबियाच्या अरामको या तेल कंपनीच्या दोन संयंत्रांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच हिंदुस्थानी रुपयात झालेली घसरण, अमेरिकी केंद्रीय बँकेच्या बैठकीपूर्वीची संभ्रमावस्था यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही घसरण सुरू होती.
२.३० लाख कोटी रुपयांचे नुकसान आज गुंतवणुकदारांना शेअर बाजारात २.३० लाख कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, काल बीएसईवर लिस्टेड एकूण कंपन्यांचे मार्केट कॅप 1,42,08,049.05 कोटी रुपये होते. ते आज 1,39,75,844.03 कोटी रुपये झाले आहे. यावरुन 2,32,205 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाहन उद्योग आणि बँकिंगमध्ये घसरण शेअर बाजारात वाहन उद्योग आणि बँकिंग क्षेत्रात घसरण झाल्याचे दिसून आले. हिरो मोटो कॉर्पच्या शेअरमध्ये ६.४२ टक्के, ऍक्सिस बँकेच्या शेअरमध्ये ४ टक्के तर आयसीआयसीआय, एसबीआय, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, टाटा स्टील, मारुती, एचडीएफसी आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअरमध्ये २ ते ३ टक्क्यांनी घट झाली. तसेच, टाटा स्टील, एलएंडटी, एनटीपीसी आणि वेदांता या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
