मुंबई: भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधात लढणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. पडळकर यांनी बारामतून लढावे, याबाबत लवकर पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय जाहीर करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा आणि शिरपूर काग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपत प्रवेश केला.

याचबरोबर, गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. गोपीचंद पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढवल्यास यंदा आपण बारामतीही जिंकू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांना बारामतीमधून उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष नेतृत्त्वाशी बोलणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली. दरम्यान त्याच पत्रकार परिषदेनंतर जेव्हा ते माध्यमांशी बोलले तेव्हा शरद पवार देतील ती जबाबदारी घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं. बारामतीतून लढ असं शरद पवार यांनी आपल्याला सांगितल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर अजित पवार लढणार हे निश्चित मानलं जातं आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून लढावं असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली तर ही लढत निश्चितच रंगतदार होईल यात शंका नाही.

गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ; बारामतीतून निवडणूक लढवावी: देवेंद्र फडणवीस