जत: देशाचे गृहमंत्री अमित शहांनी जतपासून राजकीय प्रचाराची सुरुवात आज केली. आजच्या प्रचारसभेत अमित शहा म्हणाले की, विलास जगतापना विजयी करा असे आवाहन करण्यासाठी मी आलो आहे. सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जतवासियांपुढे अमित शहांनी सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७०, राष्ट्रहित यावरच भर देत पुढे प्रत्येक नेता देतो तशी आश्वासन देत म्हणाले की, टेंभू म्हैसाळ सिंचन योजनेला निधी दिला. कर्जमाफी, शौचालय, वीज पुरवठा, प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या खात्यात थेट सात हजार रुपये दिले. त्यानंतर अमित शहांनी विविध योजनांसाठी दिलेल्या निधींची आंकडेवारी सांगत भाषण संपविले.
दरम्यान, आज जत येथे झालेल्या सभेत अमित शहा यांनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख केला. ७० वर्षांनंतर कलम ३७० हटवण्यात यश आले. कलम ३७० हटवल्यामुळे काश्मीरमधील जनता आता शांतता अनुभवत आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. तसेच केवळ मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशा निर्णयांना विरोध होत आहे, अशी टीका त्यांनी केली.
”पूर्वी पंतप्रधानांनी परदेश दौरा केला तरी कुणाला कळतही नसे. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात. तेव्हा तेथील लोक त्यांचे थाटात स्वागत करतात. मोदी मोदी अशा घोषणा दिल्या जातात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशात मिळणाऱ्या या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोठदुखी होत आहे. पण मोदी मोदीच्या दिल्या जाणाऱ्या घोषणा हा काही मोदींचा किंवा भारतीय जनता पक्षाचा सन्मान नाही. तर तो या देशातील सव्वाशे कोटी नागरिकांचा सन्मान आहे, असे अमित शहा म्हणाले.
