मुंबई: आर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध लादण्यात आलेली पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. खातेदारांनी आपापल्या अडचणींचा पाढा राज यांच्यापुढं वाचला आणि मदतीची विनंती केली. खातेदारांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याचं व निवडणूक प्रचारातील प्रत्येक भाषणात या घोटाळ्यावर बोलण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिलं.

पीएमसी बँक घोटाळा समोर आल्यानंतर त्यावर आरबीआयने काही निर्बंध लादले आहेत. त्यानंतर खातेधारकांचा राग उफाळून आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबईत आल्या असता त्यांच्यासमोर निदर्शने केली. घोषणाबाजी करत त्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला. तर काल, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान खातेधारकांनी त्यांना काळे झेंडे दाखवली.

राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे व मनसेचे नेते बाळा नांदगावकर यावेळी उपस्थित होते. राज यांनी शांतपणे खातेदारांचे म्हणणे ऐकून घेतले. तसंच, त्यांना या प्रश्नी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. खातेदारांच्या भेटीनंतर शर्मिला ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला.

पीएमसी बँक खातेधारकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; सर्व कैफियत मांडली