नागपूर: भारतीय जनता पक्षातील दिलखुलास आणि राजकारणापलीकडे जाऊन मत व्यक्त करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ख्याती आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना खुद्द नितीन गडकरी यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.

एका बाजूला पक्षातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश आणि त्याचे भविष्यातील परिणाम यावर देखील नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्र्वादीतील अनेक दिग्गज आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मात्र विरोधी पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये आलेले नेते भारतीय जनता पक्षाची संस्कृती बदलतील किंवा भाजप त्यांची संस्कृती बदलेल, असं भाकित नितीन गडकरी यांनी वर्तवलं आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी बोलत होते.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतही आपलं मत व्यक्त केलं. राज ठाकरे एक सक्षम नेते आहेत. लोक त्यांना चांगला प्रतिसाद देखील देतात. परंतु त्यांच्या पक्षाची एकूण राजकीय रणनिती थोडी चुकली आहे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सत्ताधारी पक्षाचा विजय जितका महत्त्वाचा आहे, तितकाच ताकदवान विरोधी पक्ष अस्तित्वात असणे गरजेचं असतं, असं मत नितीन गडकरी यांनी मत व्यक्त केलं.

देशात आणि राज्यात सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणे विरोधी पक्षाची मुख्य जवाबदारी असते. त्यामुळे देशातील लोकशाही यशस्वी होण्यासाठी विरोध पक्षही तितकाच महत्त्वाचा आहे. राज ठाकरे यांना विरोधी पक्षात बसण्याची इच्छा आहे ही खूप महत्वाची आणि चागंली गोष्ट आहे. जनतेने त्यांचा जरूर विचार करायला हवा, असं सूचक वक्तव्य करत नितीन गडकरी यांनी केलं आहे.

राज ठाकरे एक सक्षम नेते; जनतेने त्यांचा विचार करायला हवा: नितीन गडकरी