नवी दिल्ली: सत्त्याऐंशी वर्षांपूर्वी ‘एअर इंडिया’चे रोपटे लावणारा टाटा समूह आता पुन्हा कंपनी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. ‘एअर इंडिया’च्या खरेदीप्रक्रियेत भाग घेण्याचे सूतोवाच टाटा समूहाने सोमवारी केले. ‘मी आमच्या टीमला आढावा घेण्यास सांगेन,’ असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
टाटा समूहाच्या भावी वाटचालीविषयीचे नियोजन आणि चंद्रशेखरन यांच्या ‘ब्रिजिटल नेशन’ पुस्तकाचे प्रकाशन या पार्श्वभूमीवर ही मुलाखत घेण्यात आली. ‘हा निर्णय टाटा सूहाने नव्हे, तर विस्ताराने घ्यायला हवा. तिसरी विमान कंपनी चालविण्याची माझी इच्छा नाही. सध्या विस्तारा आणि एअर एशिया या विमानसेवा टाटा समूह चालवतो. आम्हाला विलीनीकरण करावे लागेल,’ असे चंद्रशेखरन म्हणाले.
दरम्यान, मागील वर्षी एअर इंडियामधील आपली २४ टक्के हिस्सेदारी कायम ठेवून ७६ टक्के हिस्सेदारी विकण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. कंपनीत सरकारची हिस्सेदारी कायम राहणार असल्यामुळे खरेदीसाठी कोणीही पुढे आले नव्हते, असे मानले जाते. त्यामुळे आता सरकार एअर इंडियातील सर्व १०० टक्के हिस्सेदारी विकणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या वेळी टाटाने एअर इंडियात कोणताही रस दाखविला नव्हता.
चंद्रशेखरन यांनी सांगितले की, ‘आपल्याला आपल्या हवाई वाहतूक व्यवसायासाठी काही तरी उपाय शोधावा लागणार आहे. व्यवसाय वाढविण्याची माझी इच्छा आहे. तथापि, २०२५ पर्यंत हा व्यवसाय तोट्यातच राहणार असल्याचेही मला माहिती आहे.’
